लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील सात-आठ वर्षांपासून गोंदिया शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यातच आता दोन नवीन उड्डाणपूल बायपास मार्ग आणि तिरोडा-कटंगी-बालाघाट या नवीन रिंग रोडच्या निर्मितीमुळे शहराच्या विकासाला अधिक वाव मिळणार आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नवीन रिंग परिसरात नवीन स्मार्ट सिटीची निर्मिती करण्याचे सूचक वक्तव्य केले आहे. स्मार्ट गोंदियासाठी स्मार्ट प्रयत्नांची गरज आहे. शहरालगत असलेल्या कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) होणार असून, यासाठी जागा आरक्षित असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, तर भविष्यात याच परिसरात आणखी काही प्रकल्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुडवा परिसराला महत्त्व आले असून, या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेचा विचार करता नवीन गोंदिया शहराची स्थापना होऊ शकते. राष्ट्रीय महामार्गालगत हा परिसर असल्याने व तिरोडा-कटंगी-बालाघाट या नवीन रिंग रोडची निर्मिती झाल्यास या परिसराला अधिक महत्त्व येऊ शकते. या परिसरात नवीन गोंदिया शहराची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी आधी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी कुडवा ग्रामपंचायत आणि नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे, तरच या परिसरात नवीन गोंदिया शहराची स्थापना होऊ शकते. तिरोडा-कटंगी-बालाघाट हा नवीन रिंग रोड झाल्यास बालाघाटकडे जाणाऱ्या नागरिकांना टी पाईंट चौकात जाण्याची गरज पडणार नसून, हा मार्ग थेट कंटगीवरून बालाघाट मार्गाला जोडला जाईल. त्यामुळे बालाघाट मार्गावरील टी पाॅईंट चौकातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यास सुद्धा याची मदत होणार आहे.
लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज - गोंदिया शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आणि भविष्याचा विचार करता नवीन गोंदिया शहराची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खा. सुनील मेंढे यांना त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सूचक वक्तव्यसुद्धा केले आहे.
बालाघाट मार्गाचे होणार चौपदरीकरण
nबिरसी विमानतळावर प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाल्याने या मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. शिवाय या मार्गाचे महत्त्वसुद्धा वाढले आहे. त्यामुळे गोंदिया-बालाघाट मार्गाचे रावणवाडीपर्यंत चौपदीकरणाच्या कामाला मंजुरीची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जमिनीला येणार सोन्याचा भाव - कुडवा परिसरातच मेडिकल कॉलेजचे काम सुरू होणार असून, या परिसरात शाळा, महाविद्यालय आहेत. भविष्यात काही शासकीय कार्यालयेसुद्धा स्थापन होण्याची शक्यता आहे. तर या भागातच नवीन गोंदिया शहराची स्थापना झाल्यास या परिसरातील जमिनीला सोन्यासारखा भाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता आपल्या नजरा कुडवा परिसरातील जमिनीकडे केंद्रित केल्याचे चित्र आहे.