गोंदिया : सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामात व्यत्यय येत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे.वैयक्तिक कारणांसाठी कामाच्या वेळेत होत असलेल्या सोशल मीडिया वापराचा कामावर, त्या संस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तसेच त्या व्यक्तीची क्रयशक्ती घटत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले. शहरातील सरकारी कार्यालयांमध्येही स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे नागरिकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचे दररोजच्या चित्रातून दिसून येते. फेसबूक व व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा वापर आज विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच करताना दिसतात. यात तरूणवर्ग व महिलाही मोठ्या संख्येत आहेत. स्मार्टफोनमधील नवीन अॅप्स वापरता येत नाही असे क्वचितच सापडतील. स्मार्टफोन महत्त्वाचे आणि आपल्या दैनंदिन कामात येणारे साधन बनले असले तरी याच स्मार्टफोनमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई येत असल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की, शहरातील सरकारी कार्यालयांत काम करणारे कर्मचारीही सोशल मीडियापासून स्वत:चा बचाव करू शकलेले नाहीत. जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत. सोशल मीडियावर स्मार्टफोनच्या माध्यमातून अपडेट राहणे सहज शक्य होते. विविध कार्यालयांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत स्मार्टफोनचा वापर करताना आढळत असल्याने कार्यालयीन वेळेचा उपयोग खासगी कामांसाठी करणे किती योग्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
कामांमध्ये येतोय स्मार्टफोनचा व्यत्यय
By admin | Published: January 15, 2015 10:55 PM