खतांचा अतिवापर धोकादायक
बोंडगावदेवी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत, परंतु अलीकडे या खतांचा अति वापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. मोबाइल असूनही काम होत नसल्याने यात दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या गोंदिया शहरात नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगरपरिषदेला बिलाचा भुर्दंड सोसावा लागतो.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
तिरोडा : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
चांदोरी खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील पिपरिया चांदोरी खुर्द-खैरलांजी पिपरिया रस्ता खराब झाल्याने, ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने, या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो.
घोगरा येथे स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची मागणी
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घोगरा पाटीलटोला स्वस्त धान्य दुकानदाराचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकान घाटकुरोडा येथील दुकानाला तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आले. त्यामुळे पाटीलटोला व घोगरा येथील शिधापत्रिकाधारकांना घाटकुरोडापर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घोगरा येथील स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
मुंडीकोटा : गावविकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही.
अर्धवट नाली बांधकाम ठरत आहे डोकेदुखीचे
तिरोडा : येथील शहीद मिश्रा वाॅर्ड शाहूनगर, सहकारनगर, साईनगर येथे नवीन बस स्टाॅप या परिसरातील नागरिकांना अर्धवट नाली बांधकामाचा फटका बसत आहे. त्यामुळे नालीचे बांधकाम त्वरित करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून, त्यातच नालीचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने मोटारसायकल चालकांना वळसा घालून यावे लागते. बरेचदा या ठिकाणी वाहने स्लिप होऊन अपघातही झाले आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.