गोंदिया : मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळेच कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्येसुध्दा वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८,९४४ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ३४,२४५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३) २७२ रुग्णांची नोंद झाली, तर २४० बाधितांनी कोरोनावर मात केली. ६ रुग्णांचा खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या २७२ रुग्णांमध्ये सर्वाधिक ९७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १९, गोरेगाव १३, आमगाव ३८, सालेकसा ३३, देवरी ३२, सडक अर्जुनी १९, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २० आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. मागील तीन, चार दिवसांपासून रुग्ण संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाली असून, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,४१,४८९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १,१७,५७८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १,४४,३७२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२३,९२३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८,९४४ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ३४,२४५ बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत ४,०७७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १२२ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस
कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.९३ टक्के असून, तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी निश्चित दिलासादायक बाब आहे.
...........
प्रलंबित स्वॅब नमुन्यांची समस्या दूर
गोंदिया मेडिकल कॉलेजच्या स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेचे कामकाज आता पूर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळे प्रलंबित स्वॅब नमुन्यांची समस्या दूर झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ५ हजारांवर स्वॅब नमुने प्रलंबित राहात होते. आता केवळ १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.