आमगाव : तालुक्यातील भोसा-कट्टीपार ते पांगोली नदीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करूनदेखील त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भोसा येथे रास्ता खोदो आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सुनील ब्राह्मणकर यांनी दिला.
महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला आहे; पण रस्त्याविना खेड्याकडे जायचे कसे याची खबरदारी शासनाने घ्यावी. रस्ता, विद्युत आणि पाणी हे खेडेगाव किंवा शहराच्या विकासाचे आधारस्तंभ आहेत; परंतु हे आधारस्तंभ उधळून लावण्याचे काम सरकारी यंत्रणा करीत असल्याचा आरोप ब्राह्मणकर यांनी केला आहे. आमगाव ते पांगोली नदीपर्यंतचा १६ किलोमीटरचा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यात आले. काही वर्षांपूर्वी हा रस्ता दुरुस्ती करण्यात आला होता. मात्र अल्पावधीतच या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती त्वरित न केल्यास रास्ता खोदो आंदोलन करून जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच ब्राह्मणकर यांनी दिला.