केशोरी : येथून तालुक्याला जाणारा मुख्य रस्ता गावाच्या माध्यमातून जात असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटी-दाटीने घरे असल्यामुळे जड वाहने, परिवहन मंडळाची बस जाण्यासाठी अडचण लक्षात घेऊन पर्यायी रस्ता म्हणून बायपास रस्ता सात वर्षांपूर्वी मंजूर करून रस्ता निर्मितीच्या कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले. परंतु अद्यापही या बायपास रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे केशोरी बायपास रस्ता निर्मितीचे भिजत घोंगडे कायम आहे. बायपास रस्ता त्वरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या परिसरातील नागरिकांना तालुका अर्जुनी-मोरगाव येथे जाण्यासाठी मुख्य रस्ता हा केशोरीच्या मध्य भागातून जात आहे. या रस्त्याने जाताना नेहमीच वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. जड वाहनाशिवाय परिवहन मंडळाची बससुद्धा याच रस्त्याने धावत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन या रस्त्यस्ला पर्यायी रस्ता म्हणून केशोरी गावाबाहेरून तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नाने बायपास रस्ता जिल्हा प्रशासनाने मंजूर केला. या रस्त्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून अधिग्रहित होणारे जमिनीचे मूल्यांकन शासकीय दराप्रमाणे करून मोबदला निश्चित करण्याची प्रक्रिया आटोपण्यात आली होती.
.....
भूमिपूजन होऊन लोटला सात वर्षांचा कालावधी
मागील विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी घाई-घाईने आपण मंजूर केलेल्या कामाचे दुसऱ्या कोणी प्रतिनिधीने भूमिपूजन करू नये या हेतूने तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या बायपास रस्ता निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन केले. आता भूमिपूजन होऊन सात वर्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे. परंतु अजूृनही या रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. लोकप्रतीनिधींच्या दुर्लक्षित धोरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.