गोंदिया : गुरू हे ब्रह्म, विष्णू व महेश समान आहेत. गुरू साक्षात परब्रह्म, अशाप्रकारे गुरु ची महती प्राचीन काळापासून विर्णली जात असली, तरी सध्या सोशल मीडियावरून विविध प्रकारच्या विनोदांद्वारे शिक्षकांची टिंगल उडविली जात आहे. त्यामुळे शिक्षकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.आजच्या मोबाईल युगात याच गुरूजींवर व्हॉट्सअॅप वरून विनोदाच्या रूपाने निंदानालस्ती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या तांत्रिक युगात शिक्षकांची महती कमी तर होत नाही ना, अशी भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वरून होणारी शिक्षकांची निंदानालस्ती थांबवावी व गुरूचा महिमा कायम राखावी, असे आवाहन वयोवृद्ध, सेवानवृत्त शिक्षकांकडून तसेच शिक्षणप्रेमीकडून केले जात आहे. मोबाईलवर व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. महाविद्यालयीन युवक, प्रवासी, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेचा व्हॉट्सअॅप एक आवश्यक घटक बनले आहे. या वॉट्सअॅपवरून पाठविलेले विनोद हे लवकरच हिट होतात. या विनोदातून कुणाचीही सुटका होत नाही. काही विनोद सर्वसामान्य परिस्थितीवर प्रकाश टाकतात, तर काही समाजाची निंदानालस्ती करणारेही असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या अॅपवर शिक्षकांनाच टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावरच अनेक विनोद पाठविले जात आहे. या विनोदामध्ेय शिक्षक-विद्यार्थी संवाद आणि नंतर शेवटी शिक्षकांची खिल्ली उडविणारा मजकूर असलेले विनोद बघायला मिळत आहे. या विनोदाने क्षणिक आनंद मिळत असला तरी गुरूस्थानी असलेल्या शिक्षकांची उडविली जाणारी खिल्ली चुकीची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. संस्कारक्षम विद्यार्थी. त्यांना जबाबदार नागरिक घडविण्यासोबतच ज्ञानार्जनाच्या माध्यमातून राष्ट्रविकास साधण्यात शिक्षकांचा फार मोठा हातभार असतो. मात्र वॉट्सअॅपवरील विनोदांवरून शिक्षकांचा होणारा आदर, मानसन्मान कमी तर होत नाही ना? अशी शंका या विनोदावरून वाटायला लागते. (तालुका प्रतिनिधी)
सोशल मीडियावरून शिक्षकांची टिंगल
By admin | Published: July 30, 2015 1:43 AM