अर्जुनी-मोरगाव : मुख्यमंत्री सौर योजनेतंर्गत सौरऊर्जा पंप लावले. मात्र, काही दिवसांतच ते बंद पडले. कंपनीने थातूरमातूर सुरू करुन दिले. मात्र, पुन्हा बिघाड झाला. तक्रार करूनही हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. असे अनेक पंप बंद असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
निमगाव येथील नारायण खोब्रागडे यांची सिल्ली (निमगाव) येथे गट क्रमांक ३१० मध्ये शेतजमीन आहे. त्यांचा १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सौर कृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज मंजूर केला होता. त्यांनी मागणीपत्राप्रमाणे ८२९० रुपये भरणा केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीचा ३ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला. सौरऊर्जा पंप बसविला, त्याच दिवशी मोटार बंद झाली. कंपनीने ४ दिवसांनी दुसरी मोटार बसवून दिली. १ महिन्यानंतर ती पुन्हा बंद पडली. तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करून दिली. पुन्हा ३ सप्टेंबर २०२० पासून मोटार बंद आहे. या शेतकऱ्याने अर्जुनी-मोरगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली व स्मरणपत्रही दिले. तसेच ऑनलाईन तक्रारही केली. मात्र, अद्यापही सौरऊर्जा पंप दुरुस्त करून देण्यात आला नाही.
पंप नादुरुस्त असल्यामुळे खोब्रागडे यांचे खरीप हंगामात पाण्याअभावी शेतपिकाचे नुकसान झाले. तसेच रबी हंगामालाही मुकावे लागले. असाच या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना अनुभव आला आहे. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व सौरऊर्जा पंप कंपनीने तातडीने पंप दुरुस्ती करून द्यावे नसता वीज मीटर बसवून द्यावे जेणेकरून शेतीला सिंचन होईल, अन्यथा नुकसानभरपाई देण्याची मागणी खोब्रागडे यांनी केली आहे.