परसवाडा : तिरोडा तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने एक उप जिल्हा रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. रूग्णांच्या सोयीच्या दृष्टीने विभागाने सर्व आरोग्य केंद्रांत सोलर वॉटर हिटर लावले आहेत. मात्र आजघडीला येथील एकही वॉटर हिटर सुरू नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याकडे अधिकारीच दुर्लक्ष करीत असल्याने रूग्णांचे मात्र हाल होत आहे. केंद्र व राज्य शासनाने आरोग्य सुविधेचा मोठा गाजा-वाजा केला आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मात्र एक ना धड, भाराभर चिंध्या अशात मोडत आहे. शासकीय रूग्णालयात मोफत उपचार, फोन केल्यास रूग्णवाहिका, मोफत औषध, गरम पाणी व अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना मात्र नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे, शासनाने रूग्णांना गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोलर वॉटर हिटर लावले. मात्र या केंद्रांत एकही दिवस या वॉटर हिटरचा वापर करण्यात आला नाही. परिणामी हे वॉटर हिटर केंद्रातील इमारतींवर मृतावस्थेत पडले असून फक्त शोभेचे ठरत आहेत. तालुक्यातील सुकडी डाक, वडेगाव, मुंडीकोटा, इंदोरा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत भेट दिली असता येथील वॉटर हिटर बंद दिसले. या प्रकाराबाबत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नसल्यास आम्ही काय करावे असा उलट सवाल आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी करताहेत. त्यातही दुरूस्तीचे अधिकार जिल्हा यंत्रणेकडे असल्याने केंद्र स्तरावर त्यांची दुरूस्ती शक्य नाही. रूग्णांना पावसाळ््यात व हिवाळ््यात गरम पाणी वापरावे हेच आरोग्य विभागाकडून सांगीतले जाते. मात्र दिव्या खाली अंधार असला प्रकार आरोग्य विभागात बघावयास मिळतो. आरोग्य केंद्रातील रूग्णांचा गरम पाणी उपलब्ध होत नाही. यामुळेच नागरिकांचा शासकीय रूग्णालयांवरील विश्वास उठू लागला आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्रातील सोलर वॉटर हिटर बंदावस्थेत
By admin | Published: July 21, 2014 11:55 PM