गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. याचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला बसत आहे. पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने हलक्या धानपिकांवर संक्रांत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ७६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण होत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करून दिवाळी सण साजरा करतात. सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी आणि मळणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून पाऊस सतत हजेरी लावत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
सोमवारी (दि. १७) सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. जळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बांध्यामध्ये पाणी साचले. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड होण्याची शक्यता आहे, तर पाऊस आणि वादळामुळे शेतातील उभे धानपीक पूर्णपणे झोपले गेले. परिणामी याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर दिवाळीपूर्वी धानाची विक्री करून सण साजरा करण्याच्या शेतकऱ्यांच्या आनंदावर पावसामुळे विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने चिंतेचे वातावरण आहे.
आठ दिवसांपूर्वी झाली होती अतिवृष्टी
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात यंदा प्रथमच तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे ५ ते ६ हजार हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, तर हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पाखड धान खरेदी करणार
परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर पाखड झालेला धान खरेदी कोण करणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
रावणवाडी, खातिया, कामठा परिसराला पावसाने झाेडपले
सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रावणवाडी, कामठा, खातिया परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने नुकसान झाले.