बोंडगांवदेवी : मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अतिरिक्त राज्य सरचिटणीस तथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात गुरुवारी (दि. १५) शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
चर्चेत, जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची बिंदुनामावली निश्चित करणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. उच्च श्रेणी व माध्यमिक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदाची बिंदुनामावली स्थितीबाबत संघटनेला माहिती देण्यात यावी. मागासवर्गीय पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, याविषयी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत पदोन्नती आरक्षणाविषयी शासननिर्णय होत नाही, तोपर्यंत कोणतीही पदोन्नती करण्यात येऊ नये. मात्र कालबद्ध पदोन्नती नियमितपणे करण्यात यावी. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांची पदे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे माध्यमिक शिक्षकांमधून विकल्पाद्वारे भरण्यात यावीत. इयत्ता ६ वी ते ८ वी साठी विषय शिक्षकांची रिक्त पदे प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात यावीत. विषय शिक्षक पदांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी देण्यात यावी. अस्थायी शिक्षकांना स्थायी करणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करण्यात यावी. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे सहा महिन्यांपासून सेवानिवृत्ती प्रस्ताव फाईल्स निकाली काढणेसंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी.
यावेळी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी हिवारे यांनी दिले. शिष्टमंडळात श्रीकांत जनबंधू, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे भरत वाघमारे, सिध्दार्थ भौतमांगे, शिक्षक संघटनेचे वीरेंद्र भोवते, उमा गजभिये, राजेश गजभिये, अनिल मेश्राम, किशोर डोंगरावर, उत्क्रांत उके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
...............
डीसीपीएसच्या खात्याचे विवरण नियमित द्या
सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे पेंशन विक्री अंशराशीकरण वेळेवर मिळत नसून ते त्वरित देण्यात यावे. शासननिर्णय दिनांक ७/०७/२००७ अन्वये दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून डी.सी.पी.एस. योजनेतील खात्याचे विवरण याप्रमाणे देण्यात यावे. सेवानिवृत्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे सेवानिवृत्त वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे, संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. सेवानिवृत्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना ओळखपत्र देण्यात यावे, आदी मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.