लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : पाणी हे जीवन आहे, पाण्यामुळेच अनेक जीवांचे प्राण वाचतात, अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव धमदीटोला आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. या गावात केवळ एकच बोअरवेल आहे. याच बोअरवेलवर संपूर्ण गावाची भिस्त आहे. धमदीटोला येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तत्काळ सोडवा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
धमदीटोला गाव हे पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत परसटोला-अरततोंडी व धमदीटोला गट ग्रामपंचायत आहे. हा भाग दुर्गम आहे. येथे आदिवासी लोकांची वस्ती आहे. अनेक वर्षांपासून या गावात फक्त एकच बोअरवेलवर नागरिक तहान भागवतात. हे मोठी चिंताग्रस्त बाब आहे. या गावाला सौरऊर्जा पाणी टाकीचे लघु जलकुंभ उभारण्यात यावे, याला नळयोजना जोडता येते, ही सोय ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने करावी, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.
.........
शेताच्या बोअरवेलचे पाणी वापरतो - नागरिक
गावात एकच बोअरवेल असून, ती बंद झाली तर आम्ही गावालगतच्या शेतातील बोअरवेलचे पाणी भरतो व पिण्यासाठीही वापरतो. उन्हाळ्यात तर फार अडचण होते. आमच्याकडे दुसरा उपाय नाही. पाण्याची सुविधा करुन दिले नाही.
काहीही करा पण पाण्याची सोय करा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ग्रामस्थांच्या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
............
मी स्वतः गटविकास अधिकारी आणि आमदारांशी प्रत्यक्षात बोलून निवेदन दिले. ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. सौरऊर्जा लघु जलकुंभ लावून समस्या सोडवता येईल.
- प्रीतम रामटेके, ग्रामपंचायत सदस्य
........
मी या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांना लगेच बोलून ठराव घेऊन प्रस्ताव टाकायला सांगतो.
- उत्तम राठोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अर्जुनी मोरगाव
---------------------
निवेदन प्राप्त होताच मी लगेच पाणीपुरवठा विभाग अभियंता चव्हाण यांच्याशी बोलून त्वरित समस्या मार्गी लावण्यास सांगितले आहे. लवकरच ही समस्या मार्गी लागेल.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार