देवरी : तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी, अतिदुर्गम व शंभर टक्के आदिवासी क्षेत्र असलेल्या म्हैसुली ग्रामपंचायत येथील दूरसंचार सेवा, बससेवा व आरोग्य सेवा यांच्यासह इतर अनेक समस्येला घेऊन लोकजागृती मोर्चाचे ईश्वर कोल्हारे यांनी विभागीय आयुक्त व गडचिरोली परिक्षेत्र नागपूरचे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
म्हैसुली ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा या गावात कोणत्याही प्रकारची दूरसंचार सेवेची व्यवस्था नाही. त्यामुळे या गावात एखादे मोबाईल टॉवर उभाारणे अत्यंत गरजेचे आहे. या गावात दळणवळणाची सोय नाही. या गावातून बस सेवा उपलब्ध नसल्याने या गावाचा विकास होत नाही. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीअंतर्गत आरोग्य केंद्र नाही. येथील लोकांना आपल्या आरोग्याच्या उपचारांकरिता ८ ते १० कि. मी. पायी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. गंभीर आजारी रुग्णांना काहीही पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्ण हा उपचाराअभावी दगावतो. या गंभीर विषयाबाबत कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही. तरी या गावात आरोग्य केंद्र त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्फे वनविभागाकडून या गावात २०१७-१८ या वर्षात पूर्ण झालेल्या कामांच्या मजुरीची दहा लक्ष रुपये रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. संबंधित यंत्रणेच्या दिरंगाईमुळे येथील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
....
धानाच्या बोनसची रक्कम त्वरित द्या
शेतकऱ्यांना उन्हाळी धानाची रक्कम व खरिपातील धानाचे बोनस अद्यापही मिळाले नाही. ते त्वरित देण्यात यावे, २००५ मध्ये व्याघ्र प्रकल्प नवेगावबांध यांनी या गावातील लोकांचे विस्ताराचे हक्काची जमीन हिसकावून घेतली. त्या मोबदल्यात फक्त २०० हेक्टर जमीन दिलेले आहे. परंतु, आमच्या विस्तारासाठी १२०० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. तरी ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली.