गोंदिया : शहरातील १४७ कोटींच्या भूमिगत विद्युतीकरण योजनेच्या कामाला गती देण्यासह अन्य विकासकामांना घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी विकासकामे लवकरात लवकर आटोपण्यासह शहरी व ग्रामीण भागातील वीज समस्यांना त्वरित सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता वानखेडे, उपकार्यकारी अभियंता जायस्वाल व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी, शहरातील १४७ कोटींच्या भूमिगत विद्युतीकरण योजनेच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेतली व हे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यातील ग्राम बटाना क्षेत्रात वीज दाब कमी-जास्त होत असल्याने ३३ केव्ही उपकेंद्र लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव बनविण्यास, रावणवाडी येथे दाब वाढत असल्याने होत असलेल्या त्रासाला बघता तेथे आवश्यक काम करण्यास तसेच ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या समस्यांना बघता जिल्हा नियोजन निधीतून हे काम मंजूर करण्याचे निर्देश दिले.
तसेच, कृषिपंपांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत माहिती जाणून घेतली. यावर कार्यकारी अभियंता वानखेडे यांनी, ० ते ३० मीटर अंतरावरील २०४ पैकी २०० काम सुरू असून, अन्य कामेही केली जात असल्याचे सांगितले. यावर आमदार अग्रवाल यांनी, ३१ ते २०० मीटर अंतराचे ४८० प्रकरण प्रलंबित असून ते काम ३ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतरातील ३९२ प्रकरण मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच दोन वाहन खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी, वीज कंपनीकडून कृषी व घरगुती ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत आता वाढीव बिल पाठविले जात असल्याच्या तक्रारी असून याचा आढावा घेण्यास सांगितले.