अर्जुनी/मोर : तालुक्यातील नक्षलप्रभावित आदिवासी अतिदुर्गम भागातील जनतेच्या समस्या प्रत्यक्षात ऐकून त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने व शासनाच्या सार्वजनिक व वैद्यकीय योजनांचा लाभ खेड्यातील प्रत्येक नागरिकांना मिळावा यासाठी तालुका व जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे, असे मनोगत अर्जुनी/मोरचे तहसीलदार संतोष महाले यांनी व्यक्त केले आहे.गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार गोठणगाव येथील आयोजित कार्यक्रमाता सामूहिक दावे वितरणप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाला तहसीलदार संतोष महाले, पं.स. चे सभापती तानेश ताराम, गटविकास अधिकारी कोरडे, सरपंच शंकुतला वालदे, माजी जि.प. सदस्य रतिराम राणे, तलाठी सोनवाने, ग्रामविकास अधिकारी जी.जे. जाधव, तलाठी तांबुळकर, नायब तहसीलदार अलोणे, राकेश डोंगरे, जि.प. सदस्य मीना राऊत, सर्व ग्रा.पं. सदस्य व वनहक्क समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महिन्यातील एक दिवस अती दुर्गम भागातील गावांना भेट देणे या कार्यक्रमांतर्गत गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व प्रशासनातील जिल्हा व तालुका स्तरावील अधिकारी यांनी अर्जुनी/मोर तालुक्यातील अतिदुर्गम अशा गोठणगावला १३ जून २०१४ रोजी भेट दिली होती. त्यावेळी तेथील नागरिकांच्या समस्या जवळून ऐकून त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी तालुका स्तरावरील समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश स्थानिक तहसीलदारांना दिले. यावेळी ग्रामस्थांनी गुरे चराई व स्मशानभूमीसाठी कायस्वरुपी जागा मिळावी या उद्देशाने सामूहिक दाव्यांची मागणी केली. त्या अनुषंगाने अध्यक्ष जिल्हाधिकारी वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांनी गोठणगाव येथील गट क्र. ५०३, ५०९, ५१० व ५११ अशा चार गटांमध्ये दावे तयार करुन अनु. जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम २००६ तहसीलदार संतोष महाले यांनी सदर सामूहिक दाव्याचे पट्टे सरपंच शकुंतला वालदे यांना ग्रामसभेत प्रदान केले. कार्यक्रमात गटविकासधिकारी कोरडे व पं.स सभापती तानेश ताराम यांनी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन पोलीस पाटील कारुसेना सांगोळे यांनी तर आभार ग्रामविकासअधिकारी जाधव यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्यासंख्येने ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
समस्या सोडविण्यास प्रशासन तत्पर-महाले
By admin | Published: August 16, 2014 11:34 PM