देवरी : शहरातील घरकुल लाभार्थींना थकीत अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी व अतिक्रमित जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, अशी मागणी देवरी तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
देवरी हे शहर अर्ध्यापेक्षा जास्त अतिक्रमणाच्या जागेवर वसलेले आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे येथील जागेच्या पट्ट्याचे प्रश्न हे अनेक वर्षांपासून रेंगाळत आहेत. शहरातील बहुतांश लोकांची घरे, झोपड्या हे अतिक्रमणाच्या जागेवर असल्याने पंतप्रधान आवास योजनेंतंर्गत मिळणाऱ्या घरकुलाचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा आहे. अनेक लोकांनी घरकुलासाठी अर्ज केलेला होता. परंतु बहुतांश गरीब लोकांचे घरकुल जागेच्या पट्ट्याअभावी नामंजूर झाले आहेत. ज्या ११३ लोकांना घरकुल मंजूर झाले अशांना एक वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लोटूनसुध्दा अनुदानाची पूर्ण रक्कम अद्याप मिळालेली नाही. या सर्व विषयावर नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी, जमिनीचे पट्टे व उर्वरित घरकुल अनुदान रक्कमसंदर्भात अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, देवरी तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख अनिल कुर्वे, विधानसभेचे संघटक राजीक खान, देवरी शहरप्रमुख राजा भाटीया, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रीती उईके, शिवसैनिक महेश फुन्ने, कृष्णा राखडे, करुणा कुर्वे, वंदना राऊत, सलमा राऊत आदी उपस्थित होते.