गोंदिया : जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहने यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावर वाहने यांनी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. चर्चेला उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक बागडे उपस्थित होते.
शिक्षकांचे सेवानिवृत्त वेतन प्रकरणे अविलंब निकाली काढण्यात यावे, जी.पी.एफ.धारक शिक्षकांना पावत्या देण्यात याव्या, १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना डी.सी.पी.एस. कपातीचे वितरण आर-३ मध्ये (कर्मचारी अंशदान शासन अंशदान व्याज) देण्यात यावे, जी.पी.एफ.धारक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हफ्ता जमा करण्यात यावा तसेच डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांना रोखीने देण्यात यावा, जिल्हा परिषदेत विविध कामाकरिता आलेल्या सेवापुस्तिका निकाली काढून संबंधित पंचायत समितीला पाठविण्यात यावे, शिवणी येथील सहायक शिक्षक अंकुश मेश्राम यांचे सहाव्या वेतन आयोगाचे तीन हफ्ते त्वरित जमा करण्यात यावे, यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावर वाहने यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सरचिटणीस विरेंद्र भोवते, अति.सरचिटणीस उत्क्रांत उके, अति. सरचिटणीस अविनाश गणवीर, संघटक नागेश खांडेकर, प्रमोद भांदककर उपस्थित होते.