आमगाव : शहरातील गणेशनगर परिसराला विविध समस्यांनी विळखा घातला असून, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गणेशनगरवासीयांच्या समस्या त्वरित सोडवा, अशी मागणी गणेशनगरवासीयांनी केली असून, तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनातून जवळील कालव्याचे पाणी गणेशनगरात शिरत असल्याने वाॅर्डात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. खुल्या जागेवर पाणी साचल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच कालव्याचे पाणी विनाकारण वाहत असल्याने शासनाचे नुकसान होत आहे. परिसरातील लहान मुले खेळत असताना अनेकदा साप-विंचूंमुळे भीती निर्माण झाली आहे. एक-दोनवेळा विषारी सापाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून, वेळेवर उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंतर्गंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तरी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून समस्या सोडविण्याची मागणी वॉर्डवासीयांनी केली आहे. खेमराज वासनिक, कृष्णा गुप्ता, नीशा इळपाते, दिवाकर बहेकार, शिवराज मेंढे, भूमेश्वरी फुंडे, चिनाराम फुंडे, खेमलाल उके, रजनी उपराडे, देवकांत पिंजरकर, गोकुलसिंग परदेसी, मनोज हत्तीमारे, सुषमा विधाते, चंदा अग्रवाल, नीतेश अग्रवाल, गिरीश देशमुख तसेच गणेशनगर येथील महिला व पुरुष उपस्थित होते.