यासह अनेक समस्या घेऊन येथील गावकऱ्यांनी सुधीर घुटके, प्रकाश मेंढे यांच्यासह आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन सादर करून समस्या त्वरित मार्गी लावण्याची विनंती केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव (बंध्या) हे अडीच हजार लोकसंख्या वस्तीचे गाव असून येथील सार्वजनिक पथदिवे गेल्या दोन महिन्यापासून बंद आहेत. वडेगाव (बंध्या) ते केशोरी या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्याने येणे-जाणे करणे कठीण झाले आहे. महामंडळाने शेतकऱ्यांजवळील खरेदी केलेल्या धानाचे चुकारे मिळाले नाहीत. २०२०-२०२१ च्या खरीप हंगामातील बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही. वडेगाव (बंध्या) येथील निराधारांना मागील एक वर्षापासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वडेगाव (बंध्या) येथील तलाठी सांझा चिचोली हे असून शेतकऱ्यांना येथे जाण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने वडेगाव (बंध्या) येथे नवीन सांझा निर्माण करण्यात यावा. येथील अनेक आर्थिक दुर्बल घटकांना रेशन मिळत नाही. जेव्हा विचारणा केली जाते तेव्हा रेशन दुकानदार रेशन आलेच नाही असे सांगत असतो. अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. तरी या समस्या त्वरित मार्गी लावून न्याय मिळावा यासाठी गावकऱ्यांनी सुधीर घुटक, प्रकाश मेंढे यांच्यासह आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
केशोरी परिसरातील समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:29 AM