बिरसीफाटा : रब्बी हंगामातील धान येत्या आठ-दहा दिवसांत बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. पण, शासनाने अद्यापही शासकीय धानखरेदी केंद्र सुरू न केल्याने रब्बीतील धानखरेदीचा तिढा कायम असून सर्व शेतकऱ्यांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. शासनाने त्वरित निर्णय घेऊन हा तिढा सोडविण्याची मागणी तिरोडा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात हमीभावाने धानखरेदी केली जाते. मागील २० वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. शासकीय धानखरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राइस मिलर्ससह करार करून भरडाई करून शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जात होता. ही संपूर्ण प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासूनच सुरू होती. पण, यंदा धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे संस्थांनी खरेदी केलेले धान तसेच गोदामात पडून आहे. त्यामुळे रब्बीतील धानखरेदी सुरू केली तर धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न संस्थांसमोर निर्माण झाला आहे. मात्र, शासनाने यासंदर्भात अद्यापही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे समस्येत वाढ झाली आहे. वेळेत धानखरेदी सुरू झाली नाही तर शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
......
१ मे पासून धानखरेदीच्या होत्या सूचना
शासनाने १ मे पासून रब्बी हंगामातील धानखरेदी सुरू करण्याच्या सूचना संस्थांना केल्या होत्या. पण, गोदामातील धानाची उचल न झाल्याने रब्बीत खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न आहे. रब्बी धानखरेदीकरिता ७/१२ ऑनलाइन करण्यात यावे. तलाठ्याकडून गावनिहाय रब्बी धान उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करा, अशा सूचना दिल्या आहेत. पण, तलाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे सातबारा आणि खसरा मिळण्याची अडचण आहे.