गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसमुक्तीचा नारा दिला असला तरी वास्तविकता काही वेगळीच आहे. भाजपचे राज्यातील काही मंत्री आणि आमदारच आमच्या संपर्कात असून आम्ही लवकरच जोर का झटका धीरे से देऊ, असे सूचक विधान काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खा.नाना पटोले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
पटोले म्हणाले, दुसऱ्याचे घर भाड्याने घेवून त्यावर भाजप पक्षाच्या झेंडा लावत आहे. काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे. मात्र असंतुष्ठांची संख्या भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. भाजपमधील काही विद्यमान मंत्री, आमदार काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहे. लवकरच ते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच आम्ही भाजपला जोर का झटका धीरे देऊ, असे पटोले म्हणाले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी झाली असून जागा वाटपाचा फॉर्म्युला आठवडाभरात निश्चित होणार आहे. काही जागांची अदलाबदल सुद्धा होणार असल्याचे संकेत पटोले यांनी दिले. सरकारची पीक विमा योजना फसवी निघाली असून ती केवळ विमा कंपन्याच्या फायद्याची असल्याचे शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरुन सिद्ध झाले आहे. काँग्रेसने सुरूवातीपासून ही योजना केवळ विमा कपन्यांच्या फायद्याची असल्याचे म्हटले होते. लवकरच प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर पीक विमा कंपन्याविरोधात काँग्रेसतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करुन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.