गोंदिया : लहान बालकांकडे २४ तास लक्ष देण्याची गरज असते. आई-वडिलांच्या नजरेआड झालेली बालके कधी अंगावर संकट आणतील याचा नेम नाही. मुलगा-मुलगी खेळत जरी असले तरी ते खेळता-खेळता स्वत:लाच नुकसान कसे पोहोचवतील याचा नेम नाही. यासाठी पालकांनी २४ तास त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लहान मुले खेळताना सेप्टी पीन गिळतात, घरातील लोकांची औषधे खिडकी किंवा टेबलवर ठेवली असतील तर तीदेखील लहान मुले खातात. शेंगदाणे, फुटाणे तोंडात टाकता-टाकता नाकातही टाकतात. यात लहान मुलांच्या संदर्भात परिस्थिती अत्यंत धोकादायक असते. यात लहान बालकांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. तर काही बालकांचा यात मृत्यूदेखील होतो. मागील ७ वर्षांपूर्वी छाेटा गोंदियातील दीड महिन्याच्या मुलीच्या नाकात तिच्या लहान बहिणीने चहापत्ती टाकल्याने श्वास गुदमरून त्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. लहान बालके खेळता-खेळता कोणतीही वस्तू उचलून तोंडात-नाकात टाकतात. लहान मुलांना दिलेले सुटे पैसेही ते तोंडात टाकत असतात.
.........................
मुले काय करतील याचा नेम नाही
- सुटे पैसे तोंडात टाकून ठेवत असल्याने अनेकदा ते पोटात जातात.
- सेप्टी पीन किंवा इतर साहित्य तोंडात टाकतात त्यामुळे अडचण होते.
- खेळता-खेळता गहू, हरभऱ्याची डाळ या वस्तू नाकात टाकत असल्याने त्या श्वसननलिकेत अडकतात.
- घरातील लोकांनी आपल्या आजारासाठी आणलेली औषधे खिडकी किंवा कपाटात ठेवली असतील ती औषधे लहान मुले सेवन करतात.
- गोंदिया जिल्ह्यात लहान मुलांनी खेळताना रॉकेल प्राशन केले, उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची उदाहरणे आहेत.
....................
अशी घ्या मुलांची काळजी
- लहान मुले खेळत असतील तर आपली नजर चुकवून ते साहित्य तोंडात किंवा नाकात टाकत असतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्या.
- उंदीर मारण्याचे औषध, आजारासाठी वापरण्यात येणारी औषधे बाहेर ठेवू नका.
- वेळोवेळी खेळत असलेल्या मुलांनी काही खाल्ले तर नाही याची शहानिशा करा, घातक वस्तू त्यांच्या हातात लागणार नाहीत याची खबरदारी घ्या.
...................
तीन शस्त्रक्रिया झाल्या महिनाभरात
लहान मुलांनी पोटात टाकलेली वस्तू व श्वसननलिकेत अडकलेले पदार्थ काढण्यासाठी मागील महिन्यात ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. काही मुलांनी रॉकेल व गोळ्यांचे सेवन केल्याने त्यांच्यावरही उपचार करण्यात आले.
...............