गोंदिया : रेल्वेच्या कुठल्याही समस्येमुळे चिंता करण्याची गरज नाही, असा भारतीय रेल्वेचा दावा आहे. रेल्वेने आता प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाइन क्रमांकांऐवजी आता १३९ क्रमांक जारी केला आहे. यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणे आणि रेल्वेशी संपर्क करणे अधिक सोपे होणार आहे
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी शक्यतो रेल्वेचा वापर केला जातो. अशावेळी रात्री व दुपारच्या जेवणाचा प्रश्न उद्भवतो. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यातून धावणाऱ्या गाडीतील प्रवाशांनादेखील या हेल्पलाइनमुळे मदत मिळते. प्रवास करतांना धावत्या गाडीतही आपल्याला नाश्ता किंवा जेवण हवे असल्यास आपण ते हेल्पलाइनच्या माध्यमातून मागवू शकता.
या हेल्पलाइनवर कुठली मदत मिळणार?हा नवीन नंबर रेल्वे वापरकर्त्यांसाठी एकात्मिक सेवा प्रदान करेल. प्रवासी सुरक्षा, तक्रारी, खानपान आणि दक्षतेसाठी १३९ डायल करू शकतात.
फोन करा किंवा एसएमएससर्व मोबाइल फोन वापरणारे १३९ वर कॉल करू शकतात. या क्रमांकावर, प्रवाशांना रेल्वे आणि आरक्षणाशी संबंधित मूलभूत चौकशीसाठी पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ) उपलब्धता, रेल्वे आगमन, प्रस्थान, यासारख्या मूलभूत चौकशीसाठी एसएमएस पाठवून माहिती मिळू शकते.
मराठी भाषेचाही पर्याय१३९ हा हेल्पलाइन नंबर १६ भाषांमध्ये उपलब्ध आहे. तो आयव्हीआरएस (इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टिम) वर आधारित असून, त्यात मराठी भाषेचा समावेश आहे.
१३९ रेल्वेची एकच हेल्पलाइनप्रवासादरम्यान सर्व चौकशी आणि तक्रारी नोंदविण्यासाठी १३९ या क्रमांकाचा वापर केला जातो. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, १३९ च्या व्यतिरिक्त विभागीय रेल्वे नवीन हेल्पलाइन क्रमांक किंवा तक्रार क्रमांक देणार नाही.