लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य असलेल्या 'शिवशाही'चा प्रवास कर्दनकाळ ठरेल असे कुणालाच वाटले नव्हते, भंडारा येथून सकाळी १०:४० मिनिटांनी प्रवाशांना घेऊन निघालेली शिवशाही एम.एच.०९ ई.एम. १२७३ ही सडक-अर्जुनी तालुक्यातील ते खजरी दरम्यान असलेल्या वळणावर भरधाव वेगात धावत असताना वाहन चालकाच्या चुकीने रस्ता दुभाजकला धडकून उलटली. या बसमधून एकाच कुटुंबातील चार जण प्रवास करीत यात दाम्पत्याचा मृत्यू झाला तर त्या मृताचा मुलगा आणि आई थोडक्यात बचावले.
गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सय्यद कुटुंबीय साकोली येथील नातेवाइकाच्या लग्नात गेले होते. जखमी खतीजाबी वासतअली सय्यद (७०) यांच्या नंदेकडे लग्नसमारंभ असल्याने खतीजाबी बासतअली सय्यद (७०), त्यांचा नातू अल्तास अजहरअली सय्यद (१४), आरिफा अजहर सय्यद (५२) व अजहर अली सय्यद (५५) हे चौघेही गेले होते. लग्न समारंभ आटोपून ते घरी येत असताना या बसच्या अपघातात अतिजाबीच्या आणि अल्तासच्या डोळ्यादेखत आरिफा अजहर सय्यद (५२) व अजहर अली सय्यद (५५) यांचा मृत्यू झाला. ७० वर्षांची खतिजाबी आणि १४ वर्षांचा नातू अल्तास या दोघांवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
आनंदाचे क्षण दुःखात बदलले सय्यद कुटुंबीय पारिवारिक लग्न सोहळा ओटापून आनंदाने आपल्या गावाकडे परतत होते. लग्न सोहळा सुरळीत पार पडल्याने सर्वजण गप्पा गोष्टी करीत शिवशाहीने परतत होते. दरम्यान, खजरीजवळ झालेल्या अपघातात (१४), आरिफा अजहर सय्यद (५२) व अजहर अली सय्यद (५५) यांचा मृत्यू झाल्याने सय्यद कुटुंबीयांचा आनंद क्षणात दुःखात बदलला.