गोंदिया : घरगुती वादातून सासऱ्यालाच ठार करणाऱ्या जावयाला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सन २०१८ मध्ये रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले हे प्रकरण आहे. आरोपीचे नाव कोमेश जयपाल देढे (२८, रा. कुडवा) असे आहे. न्यायालयाने गुरुवारी (दि.३) हा निर्णय सुनावला आहे.
कुडवा निवासी मृत सासरा राजेश मनोहर शेंडे (४५) व आरोपी कोमेश देढे यांच्यात घरगुती वाद होता व त्यातून देढे याने १ मार्च २०१८ रोजी शेंडे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. शेंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता.
यावर शेंडे यांच्या पत्नी मनाबाई यांनी रावणवाडी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीवर भादंवी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून तत्कालीन ठाणेदार सचिन सांडभोर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण सादर केले होते. प्रकरण जिल्हा न्यायाधीश- २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. खान यांच्या न्यायालयात होते. मृत व सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. कैलाश खंडेलवाल यांनी बाजू मांडली.
या प्रकरणात १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली व न्यायालयाने गुरुवारी (दि. ३) आरोपीला आजीवन कारावास तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात रावणवाडीचे ठाणेदार उद्धव ढबाले व शिपाई यादव कुर्वे यांनी सहकार्य केले.