गोरेगाव (गोंदिया) : शेतात रोवणीचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने मुलाचा मृत्यू झाला, तर वडील जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सलंगटोला (मुंडीपार) येथे सोमवारी (दि. ११) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. कुणाल लक्ष्मण बागळे (२१) असे मृत मुलाचे, तर लक्ष्मण बागळे असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील रोवणीचे काम सुरू आहे. लक्ष्मण बागळे कुटुंबीयांसह सोमवारी त्यांच्या शेतात रोवणीचे काम करीत होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, कुणालच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण बागळे जखमी झाले. शेतालगत काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तरुण मुलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने बागळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिरोडा तालुक्यातील धापेवाडा प्रकल्पाचे ५ दरवाजे ०.५० सेमीने उघडण्यात आले आहेत.