गोंदिया : नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी घेतलेल्या ग्राम सोनपुरी येथील विवादित जागेवरील घनकचरा प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर कचरा उचलण्यात आला नाही तर जनांदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
शहरातील मोक्षधाम परिसरात मागील कित्येक वर्षांपासून शहरातील घनकचरा टाकला जात आहे. आता त्यात कोरोनामधील कचऱ्याचाही समावेश असून, यामुळे मोक्षधाम परिसरात घाण साचली असून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून आरोग्याच्या दृष्टीने याला विरोध होत आहे. अशात नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी येथून १५ किलोमीटर अंतरावरील ग्राम सोनपुरी येथे प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. तेथे कचरा टाकला जात आहे. मात्र, हा कचरा गावातील नाल्यालगत असून तेथील कचरा नाल्याद्वारे वैनगंगा नदीत जाणार असून, याला गावकऱ्यांचा विरोध आहे. विशेष म्हणजे, गावातील सरपंचांनी ग्रामसभेच्या निर्णयाला विरोध करून ही जागा दिल्याचे गावकरी बोलत आहेत. करिता त्या जागेवर टाकण्यात आलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नटवरलाल जैतवार, अडकन तुरकर, बसंत ठाकरे, चंद्रपाल पटले, छगन अंबुले, शैलेश वैद्य, ईश्वर चौरागडे, सौरभ बोपचे, विजय कटरे, दुडीकल ठाकरे, राहुल ठाकरे आदींनी दिला आहे.