लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. बुधवारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगरपंचायत निवडणुकानंतर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगला रिझल्ट दिल्यास त्याचेच पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू शकतात. नगरपंचायत निवडणूक ही अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार शहरांपुरती मर्यादित असली तरी या निवडणुकीवर बरेच राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते या चारही शहरांत तळ ठाेकून बसल्याचे चित्र आहे, तर राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे दौरेसुद्धा वाढले आहेत. सभा, मेळावे आणि बैठकांमधून आपल्या पक्षाचा कोणता उमेदवार तगडा राहू शकतो याचा कानोसा घेतला जात आहे. कोरोनामुळे नगरपंचायतच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर गेल्या होत्या. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर केल्याने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तिकिटासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे, तर सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक ज्येष्ठ नेते आणि आमदारांवर या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे हे सर्वच आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र आहे.
एकला चलो रे चा नारा कायम - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम राहण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वबळावरच निवडणुका लढविण्यासाठी सज्ज राहण्याचा मंत्र दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनासुद्धा एकत्रित निवडणुका लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचा सूर स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये एकला चलो रे चा सूर कायम आहे.
स्थानिक नेत्यांचा लागणार कस- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा चांगलाच कस लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षात आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तविकेत असे काहीच नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये आऊट गोईंग आणि इनकमिंग जोरात सुरू आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे