गेल्या खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने एकूण ५० लाख क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली होती. या धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो; मात्र धानाच्या भरडाईचे दर, थकीत वाहतूक भाडे, धानाची गुणवत्ता, प्राेत्साहन अनुदान या मुद्दांना घेऊन राईस मिलर्सने शासकीय धानाची भरडाई करण्यास नकार दिला होता; मात्र शासनाने यावर तोडगा काढण्यास तब्बल चार महिन्याचा कालावधी लावला. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेला लाखो क्विंटल धान गोदामांमध्येच पडून होता. रब्बीतील धान खरेदीची वेळ आली तरी गोदाम रिकामे न झाल्याने धान खरेदीत समस्या निर्माण झाली होती. अखेर यावर तोडगा काढल्यानंतर राईस मिलर्सने धानाची उचल करण्यास सुरुवात केली; पण उचल फार संथ गतीने सुरू होती. आतापर्यंत केवळ उघड्यावरील ९ लाख क्विंटल धानाची उचल झाली होती, त्यामुळे गोदामांमध्ये ३० लाख क्विंटलहून अधिक धान पडला होता. दरम्यान, बिकट समस्या निर्माण झाल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने राईस मिलर्सवर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १७५ राईस मिलर्सला धानाची उचल त्वरित न केल्यास कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर राईस मिलर्सने आता युद्ध पातळीवर धानाची उचल करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी जवळपास ७० हजार क्विंटल धानाची उचल झाल्याची माहिती आहे.
..................
मुदतवाढीच्या प्रस्तावासाठी केंद्राच्या आदेशाची प्रतीक्षा
रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३० जूनला संपत आहे; मात्र आतापर्यंत केवळ ४ लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी झाली असून, अजून २० लाख क्विंटल धान खरेदी होणे शिल्लक आहे. त्यामुळे धान खरेदीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच धान खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
..........
१२९ कोटी रुपयांची धान खरेदी
रब्बी हंगामात आतापर्यंत ४ लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ही १२९ कोटी ६८ लाख रुपये असून, यापैकी ९६ कोटी रुपयांचा निधी सोमवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाला आहे. त्याचे चुकारे करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३१३८१ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.