लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १ डिसेंबरपासून सुरुवात झाली. पण मागील दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. त्यामागील कारणे म्हणजे, अद्याप एकाही प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. शुक्रवारपर्यंत सर्वच पक्षांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण झाले. यात बऱ्याच जणांना पक्षांनी हिरवी झेंडी दिली, तर काहींचे नाव शनिवारी (दि. ४) जाहीर होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शनिवारपासून वेग येण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक राजकारणावर कोणत्या पक्षाची किती पकड आहे, हे सांगणारी ही निवडणूक आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून अनेकांनी विधानसभा, लोकसभा गाठली आहे. त्यामुळे ही निवडणूक तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगर पंचायतच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १३ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत आणि नगरपंचायतीमधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीनंतर पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. आपल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावे यासाठी तगड्या उमेदवारांचा शोध पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काही उमेदवारांना पक्षांनी हिरवी झेंडी दिली असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही उमेदवार शनिवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
बंडखोरीची शक्यता बळावली- सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. एकाच जागेसाठी पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यात यश आले नाही तर बंडखोरीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात याद्या जाहीर करण्याचे नियोजन केल्याचे बोलल्या जाते. उमेदवारीवरून अनेकांची भ्रमनिराशा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत बंडखोरी झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
असंतुष्टांना संतुष्ट करणार शिवसेना - सर्वच पक्षात उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वांचेच समाधान करणे राजकीय पक्षांना सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेने सुद्धा या निवडणुकीत तगडे उमेदवार देण्याची तयारी केली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील असंतुष्ट सदस्यांना उमेदवारी देऊन संतुष्ट करण्याची तयारी ठेवल्याची चर्चा आहे.
प्रमुख क्षेत्रांकडे नजरा - जिल्हा परिषद निवडणुकीत काही क्षेत्रांत काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यात फुलचूर, नागरा, कामठा, अंजारो, एकोडी, सुकडी डाकराम, वडेगाव, डव्वा, गोठणगाव या क्षेत्रांतील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या क्षेत्रांतून दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सर्व जिल्हावासीयांच्या नजरा याकडे लागल्या आहे.