कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता शेतकरी धानाच्या जोडीला ज्वारी घेत आहे. येथील कृषी विभागाने मागील वर्षापासून जिल्ह्यात ज्वारीचा प्रयोग सुरू केला असून यंदाही जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. यामुळे कमी प्रमाणात का असेना आता जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी लावगवडीकडे वळू लागला असून जिल्ह्यात ज्वारी फुलू लागली आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धानाचे पीक घेतो. यामुळे जिल्ह्यात धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असून जिल्ह्याची ओळख धानाचा जिल्हा म्हणून आहे. खरीप तसेच सिंचनाची सोय असल्यास शेतकरी रबीतही धानाचे पीक घेत असून अन्य पिकांकडे वळण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नाही. मात्र निसर्गाची साथ नेहमीच मिळणार असे नसल्याने धानात कित्येकदा त्यांना नुकसान सहन करावे लागते. अशात धानासोबतच काही अन्य पीक घेतल्यास शेतकऱ्यांना तेवढाच हातभार लागावा या दृष्टीने कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. यातच मागील वर्षापासून जिल्ह्यात कृषी विभागाकडून ज्वारीचा प्रयोग केला जात आहे. यंदाही जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्वारीचा प्रयोेग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना दिसत असून ज्वारी चांगलीच फुलू लागली आहे. यामुळे हळूहळू शेतकरी आता ज्वारीच्या लागवड़ीकडे वळणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आरोग्यासाठी उत्तम व जनावरांना चाराहीज्वारीचा आहारात समावेश आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. यामुळे आता नागरिकांचा कल गव्हापेक्षा ज्वारीकडे वाढू लागला आहे. अशात ज्वारीची मागणी वाढणार यात शंका नाही. विशेष म्हणजे, ज्वारीला गव्हापेक्षा जास्त दर मिळत असून पाणीही कमी लागते. यामुळे ज्वारीचे उत्पादन शेतकऱ्यांना गव्हापेक्षा जास्त परवडणारे ठरणार आहे. त्यातही, ज्वारीचा कडपा उत्कृष्ट कोरडा चारा असल्याने मानवासह जनावरांसाठीही ज्वारीची लागवड फायद्याची ठरणार असल्याचे कृषी अधीक्षक गणेश घोरपडे यांनी सांगितले. यंदा ३७२ हेक्टर क्षेत्रात पेरणीकृषी विभागाकडून मागील वर्षापासून जिल्ह्यात ज्वारी लागवडीचा प्रयोग केला जात आहे. त्यानुसार, यंदाही कृषी अधीक्षक गणेश घोरडे यांनी जिल्ह्यात ज्वारीचा हा प्रयोग सुरू ठेवला आहे. यंदा जिल्ह्यात ३७२ हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्याचे चांगले परिणाम दिसत असून शेतकरीही आता ज्वारी लागवडीकडे वळत असल्याचे दिसत आहे.