बोंडगावदेवी : सर्वत्र मान्सूनची लाट सुरू झाली असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वत्र धानाची लागवड केली जाते. नापिकी बियाण्यांपासून समस्त शेतकऱ्यांची फसगत होऊ नये. बी-बियाणांची उगवण क्षमता भरपूर प्रमाणात व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी धानबीज प्रक्रिया करूनच नर्सरी धानाची पेरणी करावी, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित धानबीज प्रक्रिया व बियाणे उगवणक्षमता चाचणी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सध्या मान्सूनचे वारे वाहू लागले आहेत. खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी जोमाने लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे, शेतीवरच सर्वस्व अवलंबून आहे. शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध माहिती त्यांच्या दारापर्यंत व्हावी यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक प्रयत्नरत आहेत.
यासाठीच धानाची पेरणी करताना बियाण्यांची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेतकऱ्यांना ठिकठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी लांजेवार यांनी सांगितले. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकाची बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. बीज प्रक्रिया व उगवणक्षमता चाचणी मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यामध्ये तीन टक्के मिठाचे द्रावण कसे करायचे, बियाणे द्रावणामधून कसे बाहेर काढायचे याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले. बुरशीनाशक व जिवाणू खतांची बीज प्रक्रिया याची माहिती प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना देण्यात आली.