बोंडगावदेवी : तालुक्यातील प्रत्येक गावातील कोणतेही कुटुंब रेशनकार्डपासून वंचित राहू नये, प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानांमार्फत गरजूंना अन्नधान्याचा लाभ मिळावा, गावपातळीवर अर्ज स्वीकारून नवीन रेशनकार्ड देण्याचा धडक कार्यक्रम १२ ते १७ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. तलाठी सजाअंतर्गत येणाऱ्या गावांसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबवून कौटुंबिक शिधापत्रिकासंबंधीची सर्व कामे केली जाणार असल्याचे अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सांगितले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, पांढरवाणी (माल), नवेगावबांध, देवलगाव, सावरटोला, वडेगाव/रेल्वे, इटखेडा, माहुरकुडा, खामखुरा, कोरंभीटोला, महागाव, गौरनगर, सिरेगावबांध, चान्ना/बाक्टी, पिंपळगाव, बोंडगावदेवी, सिलेझरी, बाराभाटी, मोरगाव, अर्जुनी, निमगाव, धाबेटेकडी, आदर्श, झरपडा, चिचोली, केशोरी, परसटोला, भरनोली, इळदा, राजोली, झाशीनगर, गोठणगाव, धाबेपवनी, कोहलगाव, बोंडगाव, सुरबन, प्रतापगड या सजांमध्ये हे शिबिर घेतले जाणार आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, त्यांचे अर्ज स्वीकारून नवीन रेशनकार्ड तयार करून देणे, नाव कमी करणे, नव्याने नाव समाविष्ट करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे आदी बाबतचे अर्ज स्वीकारून कौटुंबिक रेशनकार्ड अद्यावत केले जाणार आहे. तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना योजनेबाबत माहिती नाही. सामान्य गरीब जनता तालुक्यापर्यंत जाऊ शकत नाही, अशा गरजवंतांसाठी ‘शासन आपल्यादारी’ या संकल्पनेतून तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर शिबिराचे आयोजन केले आहे.