गोंदिया : कोरोनामुळे नागरिकांनी प्रवास पूर्णपणे बंद केल्याचे दिसत असून, यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारात प्रवासी नसल्याने बसेस उभ्याच आहेत. अशात हा फटका भरून काढण्यासाठी या आगारांनी आपला फोकस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर केला आहे. यासाठी त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बसेसचे विशेष वेळापत्रकच तयार केले आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी प्रवास बंद असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जबर फटका बसला होता. त्यातून कसेबसे सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी आता बाहेरगावी जाणे टाळले असल्याने आगारांना प्रवासी मिळणे अवघड झाले आहे. परिणामी बसस्थानकात एसटी उभीची उभीच राहात आहे. यामुळे आगारांचे उत्पन्न शुन्यात आले आहे. अवघ्या राज्यातच हा प्रकार असून, महामंडळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास पुढचा काळ आणखीच कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांनी प्रवास टाळला असला तरीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपले काम करावेच लागणार आहे. यासाठी राज्य शासनाने त्यांना प्रवासाची सूटही दिली आहे. अशात होत असलेले नुकसान यांच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी आगारांनी आता या कर्मचाऱ्यांवर फोकस केला आहे. याकरिता आगारांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विशेष वेळापत्रकच तयार केले आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीने वेळापत्रक ठरविण्यात आले असून, त्यांच्या सोयीने बसेस ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्यांचे काम होईल आणि आगारालाही यातून उत्पन्न मिळेल, हा यामागचा उद्देश आहे.
-------------------------------------------
विविध मार्गांवर केले फेऱ्यांचे नियोजन
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या या नियोजनात गोंदिया आगाराने ७ मार्गांवर १८ फेऱ्यांचे वेगवेगळ्या वेळांवर नियोजन केले आहे, तर तिरोडा आगाराने ८ मार्गांवर २९ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, यासाठी आगाराला तेवढ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मात्र, तेवढे कर्मचारी नसल्याने या फेऱ्या रद्दही केल्या जाणार आहेत.