गोंदिया : २१ जून हा दिवस देशात जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जात असून यामध्ये शासकीय-खासगी सर्वच विभागांकडून काही नवे प्रयोग केले जातात. त्यातच भारतीय डाक विभागाने योग दिनी सर्वच टपालांवर योग दिनाचा विशेष मुद्रांक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत डाक विभागाकडून देशातील ८१० मुख्य डाक कार्यालयांना कळविण्यात आले असून तसे मुद्रांक जाहीर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वितीय आंतरराष्ट्रीय दिनाच्या स्मृतीत सूर्यनमस्कारवरील स्मारक टपाल तिकिट जारी केले होते. तर सन २०१७ मध्ये यूएन पोस्टल प्रशासनाने न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करण्यासाठी १० योग आसन दर्शविणाऱ्या शिक्यांचा संच जारी केला होता. तर यंदा भारतीय डाक विभागाकडून योग दिनी विशेष मुद्रांक टपालांवर लावले जाणार आहे.