गोंदिया : जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये विशेषतः गोंदिया शहरातील नवतरुण - तरुणी आणि जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांची जागृती व्हावी, वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, याकरिता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते. भरधाव वेगात वाहन चालवून लोकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरूद्ध दोन दिवसात कारवाई करून १०१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध २४ व २५ जून रोजी कारवाई करण्यात आली. हलगर्जीपणे वाहन चालविणे, लापरवाहीने भरधाव वेगात वाहन चालविणे, विरूध्द दिशेने गाडी चालविणे अशा लोकांवर भादंविच्या कलम २७९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व गोंदियाकरांचा त्रास कमी करण्याकरिता कटिबध्द असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे. सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा, जिल्ह्यातील वाहतूक रहदारीचे योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करून सदैव प्रयत्नशील आहेत.
अल्पवयीन मुलांनी नियमांचे पालन करावे
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः अल्पवयीन मुले - मुली, शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
नियम तोडणाऱ्या ९० जणांना दिले गुलाबाचे फूलपोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून गोंदिया शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे सिग्नल तोडणारे, विरूद्ध दिशेने गाडी चालविणारे अशा ९० जणांना जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे गुलाबपुष्प देत वाहतूक नियम सांगण्यात आले.
हलगर्जीपणे वाहन चालविणाऱ्यांवर दोन दिवसात दाखल केलेले गुन्हे
पोलिस ठाणे------- दाखल गुन्हेगोंदिया शहर- ०७,
गोंदिया ग्रामीण-११,रावणवाडी-०२,
तिरोडा-११गंगाझरी-०३
दवनीवाडा-०८,आमगाव-१०,
गोरेगाव- ०९सालेकसा-०२
देवरी- ०४डुग्गीपार -१०
अर्जुनी / मोरगाव -०६नवेगावबांध -०७
केशोरी-०६चिचगड -०५