शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे व इतर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल उपलब्ध व्हावा या उद्देशातून शेतकरी ते थेट ग्राहक रयत बाजारामुळे जोडण्यात येत आहेत. या अभियानामुळे शेतकरी भाजीपाला ठोक विक्रेत्याला विकत न देता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दलालाला जाणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानुसार कारंजा येथील बाजारात तालुक्यातील ग्राम चुटीया, खमारी, वडेगाव, कासा, कारंजा येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळे, गूळ, काळा तांदूळ, काळा धान विक्रीकरिता आणला होता. या रयत बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विष्णू साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी रयत बाजाराला भेट देऊन उत्पादक शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधला. उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार शेतमालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले, तसेच ग्राम बिरसोला येथील प्रसिद्ध गुळाची खरेदी केली. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील खडसे, कृषी पर्यवेक्षक वामन टेंभुर्णे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन उपस्थित होते. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे आयोजन आत्माअंतर्गत करण्यात आले होते. बाजारासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कलेवार, नंदनवार, कृषी पर्यवेक्षक मेंढे यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी सहायक व कृषी मित्रांनी सहकार्य केले.
कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत रयत बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM