तिरोडा आगार मशीनलेस : गोंदिया आगाराला केवळ एक स्वाईप मशिनगोंदिया : जिल्हा कॅशलेस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असला तरी एसटी महामंडळाकडून अजून पाहीजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. गोंदिया आगारात एकाही बसफेरीला स्वाईप मशिन दिलेली नाही. केवळ पास सेक्शनमध्ये एक मशिन प्रायोगिक तत्वावर दिलेली आहे. त्यामुळे कॅशलेससाठी एसटी महामंडळ उदासीन असल्याचे दिसून येते.डिजिटल इंडिया प्रकल्पामुळे प्रत्येक क्षेत्रच कॅशलेस होवू पाहत आहे. त्यात आता राज्य परिवहन महामंडळही प्रवेश करू पाहत आहे. मात्र केवळ मोठ्या आगारांना केवळ एक किंवा दोन स्वाईप मशिन्स देण्यात आल्या आहेत. यात भंडारा आगाराला दोन तर गोंदिया आगाराला केवळ एकच स्वाईप मशिन देण्यात आली आहे. तिरोडा आगाराला तर एकही स्वाईप मशिन देण्यात न आल्याने ते आगार मशिनलेस असल्याचे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गोंदिया आगाराला मिळालेली स्वाईप मशिन ही प्रायोगिक तत्वावर देण्यात आली आहे. ती मशिन पास सेक्शनसाठी असून विद्यार्थी किंवा पासधारक व्यक्तींची पास बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापक ते आगारातील पर्यवेक्षीय पदांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. परंतु सर्वाधिक तिकिटांची विक्री एसटी बसमध्येच होते. त्यामुळे प्रायोगिक तत्वांवर काही मशिन्स बसमध्ये देवून वाहकांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे चिल्लरअभावी होणारा प्रवासी व वाहकांना होणारा त्रास वाचू शकणार होता. परंतु पास सेक्शनमध्ये सदर मशिन देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.मागील पाच वर्षातील गोंदिया आगाराची कारकीर्द बघितली असता अनेक वाहक निलंबित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी योग्य तिकीट न देणे, कधी पैसे घेवून तिकीट न देणे तर कधी उर्वरित पैसे परत न करणे या घटना वाहकांकडून घडल्या आहेत. त्यामुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईपर्यंत सामोरे जावे लागले. जर वाहकांना स्वाईप मशिनचे प्रशिक्षण देवून त्या मशिन्सचा बसेसमध्ये उपयोग करण्यात आला तर वाहकांना निलंबनाच्या कारवाईला तोंड द्यावे लागणार नाही. तसेच चिल्लरअभावी वाहक व प्रवाशांना होणारा त्रास टळू शकेल. विशेष म्हणजे गोंदिया आगारात ९० बसेस असून दिवसातून तब्बल ४४० बसफेऱ्या या बसेसच्या होतात. मात्र बसेसमध्ये स्वाईप मशिन्स न दिल्याने त्रास राहणारच आहे. तर विद्यार्थ्यांसाठी पास सेक्शनमध्ये स्वाईप मशिन ठेवण्यात आल्याने विद्यार्थी स्वाईप करण्यासाठी कार्ड कुठून आणतील, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विद्यार्थ्यांकडे कोणते अर्थाजनाचे कोणते साधन असते? त्यामुळे ते कोणते कार्ड स्वाईप करून पासचा शुल्क भरतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी)
कॅशलेससाठी एसटी महामंडळ उदासीन
By admin | Published: February 10, 2017 1:14 AM