लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : राज्य परिवहन महामंडळ साकोली आगार येथून साकोली-केशोरी दिवसातून चार बसफेऱ्या आहेत. केशोरी येथे बसफेरी पोहचल्यानंतर प्रवाशांची वाट न पाहता चालक व वाहक आपल्या मर्जीप्रमाणे वेळेअगोदर बस सोडून एसटीच्या उत्पन्नात घट करीत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात साकोली आगार व्यवस्थापकांचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. निर्धारित केलेल्या वेळेपूर्वी बस सोडल्यामुळे येथील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. परिणामी प्रवाशांना अवैध प्रवाशी वाहनांचा वापर करून प्रवास करावा लागला. याकडे साकोली आगार प्रमुखांनी लक्ष देऊन केशोरी येथून बसफेरी निश्चित केलेल्या वेळेतच सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. गुरूवारी (दि.११) साकोली आगाराची साकोली-केशोरी ही बसफेरी केशोरीला ९.३० वाजता पोहोचून ती भरनोलीच्या पुढील प्रवाशासाठी निघत असते. ती बसफेरी भरनोली येथे न जाता केशोरीवरून सकाळी १०.१५ वाजता सोडल्यामुळे अनेक प्रवाशांना सदर बसफेरीपासून मुकावे लागल्याने त्यांना कमालीचा त्रास झाला. वास्तविक या बसफेरीची केशोरीवरून साकोलीकरिता सुटण्याची वेळ १०.४५ वाजता असून वेळेपूर्वी घाटोळकर नामक चालकाने सोडल्यामुळे प्रवाशांची फारच गैरसोय झाली. या संदर्भात साकोली आगार प्रमुखांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चालकाचा मामा स्वर्गवासी झाल्याने त्यांनी बसफेरी भरनोली येथे न नेता केशोरीवरूनच वेळेपूर्वी परत साकोलीकरिता नेली, असे कारण त्यांनी सांगितले. तर अशावेळी प्रवाशांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणामुळे एसटीच्या उत्पन्नावर किती परिणाम झाला आहे, याचे त्यांना देणे-घेणे दिसत नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक चांगल्या योजना कार्यान्वित केल्या, पण या योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवाशाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटी चालविताना चालक चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र अनेक बसमधून दिसून येते. प्रवासादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी असूनही चालक मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसून येतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटी आगार व्यवस्थापकांचा भोंगळ कारभार
By admin | Published: May 13, 2017 1:45 AM