गोंदिया : अवघ्या देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक बघावयास मिळतोय त्यात राज्य आघाडीवर असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची वाढ होत आहे. राज्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून, यामुळेच आता राज्य शासनाने काही निर्बंध लावून शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दोन दिवसांत पूर्णपणे लॉकडाऊन पाळावा लागला असून, एसटीने प्रवासाला मात्र सूट आहे. असे असले तरीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे बंद पडून असलेला व्यापार बघता नागरिकांनीही घराबाहेर निघणे व प्रवास टाळला आहे. परिणामी शनिवारी आगारातील सात, तर रविवारी तीन बसेस धावल्या व त्यांनी १४४८ किलोमीटरचा प्रवास केला. यातून आगाराला ४४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, फक्त डिझेल काढता आले असल्याचे कळले.
---
दोन दिवसांत सुमारे आठ लाखांचा तोटा
कोरोना परिस्थिती मध्यंतरी नियंत्रणात आल्यानंतर एसटीला सुगीचे दिवस येत होते. मात्र काही काळ लोटताच पुन्हा कोरोनाने उद्रेक सुरू केला असून, परिणामी प्रवाशांची संख्या घटू लागली आहे. यामुळे आगाराला दररोज सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आता कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत असून, मागील वर्षापेक्षा दुप्पटीने बाधितांची संख्या दिसून येत आहे. त्यात निर्बंध व वीकेंड लॉकडाऊनमुळे एसटी अडचणीत आली असून, आगाराला दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनमुळे सुमारे आठ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.
------------------------------
५० चालक व ५० वाहक ड्यूटीवर
कोरोना उद्रेकामुळे राज्य शासनाने शासकीय कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी कामावर घेण्याचे आदेश काढले आहे. त्यात आता नागरिकांनी प्रवास टाळल्याने एसटीच्या फेऱ्याही घटल्या आहेत. अशात आगाराने ५० चालक व ५० वाहकांना ड्यूटीवर घेतले असून, ७४ चालक व ५० वाहकांना सुटी दिली आहे, तर लिपीकवर्गीय कर्मचारी अगोदरच कमी असून, त्यात तीन कर्मचारी बाधित असल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
------
कोट
कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळला आहे. परिणामी भरभरून धावणाऱ्या एसटीत आता मोजकेच प्रवासी दिसत आहेत. त्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये मोजक्याच फेऱ्या गेल्या व फक्त डिझेल निघेल एवढाच पैसा हाती आला. यामुळे एसटी तोट्यात धावत आहे.
- संजना पटले
आगारप्रमुख, गोंदिया
-----------------------------
- आगारातील एकूण बसेसची संख्या- ८०
- दोन दिवसांत धावलेल्या बसेस- १०
- फेऱ्या झाल्या आगारामध्ये - १८
- पैसे मिळाले दोन दिवसांत - ४४०००