लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर असताना रब्बीतील धान खरेदीला विलंब केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोदामांचे नियोजन करुन २७ मे पूर्वी सर्व धान खरेदी केंद्र सुरु करुन शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील धान भरडाई आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा पणन अधिकारी पाटील, आदिवासी विकास महामंडळाचे अविनाश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी देविदास वानखेडे उपस्थित होते. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची काही केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, सर्वच केंद्र २७ मे पूर्वी सुरु करा, खरेदी करण्यासाठी स्थानिक स्तरावर गोदाम भाड्याने घ्या, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, आदिवासी विकास महामंडळाने त्वरित नियोजन करुन खरेदीला सुरुवात करावी तसेच खरीप हंगामाच्या तोंडावर रब्बीतील धान खरेदीने शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची दखल घेण्याचे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी यावेळी दिले. या बैठकीला राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनाही लवकरात लवकर धानाची उचल करण्याची सूचना केली. त्याला राईस मिलर्सनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे लवकरच सर्व धान खरेदी केंद्र सुरु होण्याची शक्यता आहे.