देवरी : तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असलेले देवरी ते मुदरोली-मंगेझरी-म्हैसुली-चिचगड या मार्गावर राहणाऱ्या लोकांना दळणवळणकरिता कोणतीही बससेवा उपलब्ध नाही. परिणामी येथील लोकांना त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर त्वरित बस सेवा सुरू करण्याची मागणी लोकजागृती मोर्चाचे ईश्वर कोल्हारे यांनी राज्य परिवहन विभाग भंडाराचे विभागीय नियंत्रक गौतम शेंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.
देवरी तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असलेले मंगेझरी व म्हैसुली या गावातून जाणारी एकही बससेवा सुरू नसल्याने या गावातील लोक बससेवेपासून वंचित आहेत. या गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दररोज देवरी शहराकडे यावे लागते. गावातील इतर लोकांना शासकीय व वैयक्तिक कामासह बाजार व किराणा साहित्याच्या खरेदीकरिता देवरी शहराकडे यावे लागते. यात त्यांना ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या मदतीकरिता या मार्गावर बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. देवरी-मुरदोली-मंगेझरी-म्हैसुली-चिचगड या मार्गावर त्वरित बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.