इंदोरा बुजरुक : तिरोडा आगारातून तिरोडा-धापेवाडा गोंदिया या मार्गावरील बस सेवा सुरू करा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांनी केली आहे.
लॉकडाऊनपूर्वी या मार्गावर एसटी बस नियमित सुरू होत्या; परंतु २३ मार्च २०२० पासून संपूर्ण लॉकडाऊनमुळे सर्वच बस बंद करण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली व गोंदिया जिल्ह्यातील सर्वच डेपोमधून बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या पूर्वी ज्या एसटी बस सेवा सुरू होत्या त्या नियमित सुरू झाल्या नाहीत. तिरोडा आगारामधून तिरोडा-धापेवाडा-गोंदिया या मार्गावर सकाळी ६.३० आणि ७.३० वाजताची नियमित बस सुरू होती; परंतु या दोन्ही फेऱ्या सध्या बंद आहेत. त्या चालूच करण्यात आल्या नाहीत. जेव्हापासून सर्व डेपोमधून बस सुरू झाल्या तेव्हापासून या दोन्ही फेऱ्या बंद आहेत. तेव्हा प्रवासी विद्यार्थ्यांचे जाणे-येणे बंद होते; परंतु सद्य:स्थितीमध्ये प्रवाशांचे येणे-जाणे वाढले आहे. विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून तिरोडा ते धापेवाडा-गोंदिया या मार्गावर सकाळपाळीची एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागतो.
....
या वेळेत बस सुरू केल्यास होईल मदत
आता या मार्गावर प्रवास करण्यासाठी तिरोडा आगारामधून ८.३० वाजता पहिली फेरी सोडली जाते. ती १०.४५ पर्यंत गोंदियाला पोहोचते. गोंदियावरून ११ वाजता सुटून तिरोडा येथे १ वाजता पोहोचते. सकाळपाळीची तिरोडा येथून ७ वाजता बस सोडली, तर धापेवाडा-गोंदिया ९ वाजता पोहोचेल यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना फायदा होईल. सकाळच्या वेळी या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त असते व बसची वाट पाहता पाहता ९ वाजेपर्यंत त्यांना उभे राहावे लागते. बस नसल्यामुळे जोडफाटा परसवाडावरून प्रवाशांना खासगी वाहन व ऑटोमधून गोंदियापर्यंत प्रवास करावा लागतो. पूर्वीप्रमाणेच तिरोडा आगारातून ६.३० किंवा ७ वाजताची बस फेरी तिरोडा- धापेवाडा -गोंदिया मार्गावर सुरू करण्याची मागणी आहे.