सालेकसा : भारतीय जनता पक्ष सालेकसा मंडळाच्या वतीने जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदीसाठी केंद्रांवर त्वरित धान खरेदी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. तसेच बुधवारपर्यंत (दि.२६) मागण्यांची पूर्तता न झाल्यास गुरुवारपासून (दि.२७) आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात, रबी धान खरेदी केंद्रावर त्वरित धान खरेदी करण्यात यावे, शेतकऱ्यांना ७०० रु. बोनस देण्यात यावा, ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी व धडक सिंचन विहिरीचे बिल त्वरित देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना महामंत्री यादन नागपुरे, भाजयुमो अध्यक्ष आदित्य शर्मा, नगरपंचायत सभापती उमेदलाल जैतवार, बबलू शिवनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.