सडक-अर्जुनी : ग्राम कनेरी येथील श्रीकृष्ण अवधूत आश्रमशाळेच्या इमारतीत धान खरेदी १ दिवस सुरु करण्यात आली व त्याच दिवशी मुख्याध्यापकांनी बंद पाडली. त्याच प्रमाणे चिखली येथे आतापर्यंत धान खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रब्बी धान असून धानाची विक्री कुठे करावी असा प्रश्न पडला आहे. करिता कनेरी व चिखली येथे तात्काळ धान खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
केंद्रांवर धान खरेदी बंद असल्याने बाहेर व्यापाऱ्याला धान विक्री केल्यास प्रती क्विंटल ५०० ते ६०० रुपये नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. धान खरेदी केंद्र सुरु न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याची गरज आहे. जर कनेरी व चिखली येथे रब्बी धान खरेदी २ दिवसांच्या आत सुरु न झाल्यास शेतकरी धान खरेदीचे विषय घेऊन नाईलाजास्तव रस्त्यावर उतरु व वेळ पडल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नामदेव लक्ष्मण चुटे, कनक सोना ब्राम्हणकर, पतिराम बकाराम सयाम, ईश्वर कोरे, दाजीबा बकाराम खोटेले, शामराव अंताराम कापगते आदि शेतकऱ्यांनी दिला आहे.