गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी त्वरित आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी गोंदिया ताक्का भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि.२७) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
खरीप हंगाम तोंडावर असूनही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने, रब्बी हंगामातील धान शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशात आपला धान त्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्याकरिता रब्बीतील धान खरेदीसाठी त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करावे, खरिपातील बोनसची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेंतर्गत घोषित ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम द्यावी, शेतीसाठी किमान १६ तास वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे व शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या नेतृत्वात आयोजित या धरणे आंदोलनात माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, संपर्कप्रमुख वीरेंद्र अंजनकर, माजी आमदार रमेश कुथे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, नंदू बिसेन, संजय कुलकर्णी, नेतराम कटरे, प्रकाश रहमतकर, संजय टेंभरे, मनोज मेंढे, अर्जुन नागपुरे, पप्पू अटरे, अशोक हरिणखेडे, सुधीर ब्राह्मणकर, योगराज रहांगडाले, देवचंद नागपुरे, जगदीशप्रसाद अग्रवाल, संतोष चव्हाण, प्रवीण पटले, भावना कदम, दिनेश दादरीवाल, पारस पुरोहित यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.