दोन कोटींची विकास कामे : आमदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मंजूर भवानी मंदिर चौक ते सूरज चौक रस्ता सिमेंटीकरण बांधकाम व वसंत लिथो प्रेस कुडवा नाका रस्ता चौपदीकरण, डांबरीकरण आदी दोन कोटी रुपये खर्चाची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. यावेळी ते वाजपेई चौक ते मुर्री चौकी रस्ता डांबरीकरण बांधकामाची पाहणी करण्यासाठी दौरा करीत होते. याप्रसंगी उपस्थित कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी आमदारांना सांगितले की, भवानी मंदिर ते सूरज चौक रस्त्याच्या सिमेंटीकरण बांधकामाची सुरुवात करण्याचे आदेश काही महिन्यापुर्वी राधारमन अग्रवाल नावाच्या कंत्राटदाराला व वसंत लिथो प्रेस मार्गाच्या डांबरीकरण व चौपदीकरण बांधकाम करण्याचे आदेश उमेश असाटी नामक कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती दिली. यावर आमदार अग्रवाल यांनी दोन्ही कंत्राटदारांना त्वरित काम सुरु करण्याचे आदेश दयावे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले. यावेळी कार्यकारी अभियंत्यानी सांगितले की दोन्ही मार्गावर काही प्रमाणात अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी नगर परिषदेकडून सहकार्य केले जात नाही. त्यामुळे रस्ते बांधकामाच्या कार्यात असुविधा होत आहे. या संदर्भात आमदार अग्रवाल यांनी मौक्यावरच न.प. मुख्याधिकारी चंदन पाटील यांना बोलाविले. तसेच अतिक्रमण त्वरित हटवून बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सदर रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरु केले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. यावेळी विजय नत्थूलाल अग्रवाल, रवि मुंदडा, कार्यकारी अभियंता चव्हाण, कनिष्ठ अभियंता कटरे, कृष्ण गौरक्षण सभेचे अध्यक्ष अजय अग्रवाल, छैलबिहारी अग्रवाल, राकेश ठाकुर, नगरसेवक शकील मंसुरी, देवा रुसे, भागवत मेश्राम, मंटू पुरोहित, सुनील तिवारी, निर्मला मिश्रा, व्यंकट पाथरु, सुनील भालेराव, क्रांतीकुमार जैस्वाल, हिवराज शहारे, दिलीप तुळसकर, सचिन (बंटी) मिश्रा, मुकेश बिरिया, नरेंद्र चांदवानी, आनंद महावत, भगत ठकरानी उपस्थित होते.
मंजूर रस्त्यांचे बांधकाम सुरु करा
By admin | Published: July 09, 2017 12:18 AM