गोरेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे एक कोविड केअर सेंटर तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आ. विजय रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नवाब मलिक यांना दिले.
तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूने पाय पसरले आहे. परंतु, येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर नसल्याने गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वेळेवर उपचार करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर देण्यात यावे, अशी मागणी बारेवार यांनी निवेदनातून केली आहे. आ. विजय रहांगडाले, परिणय फुके यांनीही समर्थन देत तत्काळ कोविड केअर सेंटर सुरु करावे,अशी मागणी केली. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व इतर आरोग्य कर्मचारी असल्याने ग्रामीण रुग्णालयाबरोबर कर्मचारी वसाहत इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केल्यास १०० बेडची व्यवस्था होऊ शकते व ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था केली जाऊ शकते. अशा १३० बेडची व्यवस्था झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकते. या रुग्णालयात ऑक्सिजन व सिटी स्कॅन मशीनची व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.