नवेगावबांध : गोंदिया-चांदाफोर्ट पॅसेंजर रेल्वे गाडी लवकरात लवकर सुरू करावी तसेच जबलपूर-चंद्रपूर या एक्स्प्रेस गाडीचा थांबा देवलगाव (नवेगावबांध) स्टेशनवर येथे देण्यात यापा, अशी मागणी नवेगावबांध परिसरातील प्रवाशांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र अद्यापही गोंदिया-चांदाफोर्ट ही पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आली नाही. तर नुकतीच जबलपूर-चांदाफोर्ट ही एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. पण या एक्स्प्रेस गाडीला महत्त्वपूर्ण स्थानकावर थांबा देण्यात आला नाही, त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम आहे. जबलपूर-चंद्रपूर या रेल्वे गाडीचा थांबा देवलगाव येथे देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. नवेगावबांध गावालगत रेल्वे स्टेशन देवलगाव नावाने ओळखले जाते. येथे राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प तसेच पक्षी अभ्यासासाठी देशातून व विदेशातून लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. पर्यटनासाठी इटियाडोह धरण, झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प, पर्यटन संकुल, नवेगावबांध जलाशय, नवोदय विद्यालय आहे. प्रतापगड तिबेटी वसाहत, बंगाली वसाहत, आदिवासीबहुल ग्रामीण परिसर आहे. नवेगावबांध हे धान्य, तांदूळ याचे मोठे व्यापारी केंद्र असून, या ठिकाणी हेलिपॅडचीसुद्धा व्यवस्था आहे. या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास पर्यटकांना येण्या जाण्याकरिता रेल्वे सुविधा चा लाभ मिळणार आहे. तसेच पर्यटन वाढीस मदत होईल.
...
प्रवाशांना होणार मदत
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अनेक कामासाठी स्थानिक व परिसरातील नागरिकांना गोंदियाला जावे लागते. अर्जुनी मोरगाव या आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी नागरिकांना वारंवार जावे लागते. रेल्वे तिकीट दराच्या चारपट भाडे बसच्या तिकिटासाठी किंवा खासगी वाहनांसाठी प्रवाश्यांना द्यावे लागते. त्यामुळे जास्तीचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. या लॉकडाऊनच्या काळात बरीच आर्थिक झळ नागरिकांना बसली आहे. प्रवासाची सुविधा नसल्यामुळे गोंदिया-चंद्रपूर-बल्लारशा या रेल्वे गाडीची नियमित सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
......
यांच्याकडे केली मागणी
गोंदिया-चांदाफोर्ट आणि जबलपूर- चांदाफोर्ट या दोन्ही रेल्वे गाड्यांबाबत नवेगावबांध व परिसरातील नागरिकांनी खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील मेंढे, नागपूर रेल्वे विभागाचे डीआरएम यांना दिले आहे.