अर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान खरेदी करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाध्य करीत आहे. मागील हंगामातील धानविक्रीचे बोनस अजूनही प्रलंबित आहे. कोरोनाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर नवे संकट उद्भवले आहे. अशात धानखरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केली आहे.
खरीप हंगामाच्या तयारीची वेळ येऊन ठेपली असून मान्सून तोंडावर आहे. उत्पादित धान घरात ठेवायला जागा नाही. अद्याप जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी खासगी व्यापारी ठाण मांडून बसले आहेत. व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात धानाची विक्री करावी लागत असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
मागील हंगामातील बोनस प्रलंबित आहे. कोरोनाचे संकट व धान खरेदीचा तिढा यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा कठीण समयी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. गत हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने गोदाम भरलेले आहेत. नव्याने खरेदी केलेला धान कुठे साठवायचा हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने राईस मिलर्सशी वाटाघाटी करून गोदामे रिकामी करावीत. पूर्ण क्षमतेने जिल्ह्यातील शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.